
पुणे : सोलापूर आणि पुणे विभागीय रेल्वे मंडळातील खासदारांच्या उपस्थितीत रेल्वे महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी आज आढावा बैठक घेतली. पुणे येथे पार पडलेल्या या बैठकीला खासदार धनंजय महाडिक, संजयकाका पाटील, खासदार उदयनराजे, खासदार विजयसिंह मोहीते पाटील
यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत खासदार महाडिक यांनी प्रस्तावीत कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाची सद्यस्थिती सविस्तरपणे सांगण्याची मागणी केली. या मार्गाचं काम आय. पी. आर. सी. एल. या कंपनीच्या माध्यमातून होणार असून, ही कंपनी सध्या नव्या रेल्वे मार्गाचा अभ्यास करत असल्याचं डी. के. शर्मा यांनी सांगितलं. कोल्हापूर रेल्वे स्थानक, मॉडेल स्टेशनच्या रुपात विकसीत केलं जावं ही मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबीत आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनसच्या धर्तीवर कोल्हापूर स्थानकाचा विकास व्हावा, अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली. त्यासाठी तत्काळ पावले उचलावीत, अशा सूचना त्यांनी केल्या. खासदार महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकावर विकासकामे सुरू असल्याचं शर्मा यांनी स्पष्ट केले. आजवर झालेल्या कामांची माहिती देवून, लवकरच राजारामपुरीच्या बाजूला तिकीट बुकींग व्यवस्था सुरू केली जाईल. खासदार महाडिक यांच्या सूचनेनुसार एका स्वयंचलित जिन्याचं काम सुरू असून, तशाच प्रकारच्या दुसर्या जिन्याचा प्रस्ताव तयार करू असं शर्मा यांनी नमूद केलं. स्थानकावरील प्रतीक्षा कक्षाचं काम नोव्हेंबर अखेर पूर्ण हाणार आहे. तसेच अन्य प्लॅटफॉर्मवर शेड मारणे आणि इतर कामं सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापुरातील गुडस यार्ड मध्ये येणारा माल उतरवण्यासाठी खूप वेळ जातो. परिणामी कोल्हापुरातून साखर पाठवताना विलंब होतो. साखर हा नाशवंत माल असल्याने तो लवकरात लवकर रवाना करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक सुधारणा कराव्यात आणि प्लॅटफॉम क्रमांक ३-४ वर शेड उभी करावी, अशी सूचना खासदार महाडिक यांनी केली. कोल्हापूर- मिरज, रेल्वेमार्ग दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाची सद्यस्थिती काय आहे, अशी विचारणा खासदार महाडिक यांनी केली. या मार्गाचं सर्वेक्षण झालं असून विद्युतीकरणाचं काम नोव्हेंबर २०२२ अखेर, तर दुहेरीकरणाचे काम मार्च २०२४ अखेर पूर्ण होईल, असे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. कोल्हापूर अहमदाबाद रेल्वे पुढे राजकोटपर्यंत नेण्यात यावी, प्रत्येक रेल्वे स्थानकावर वैद्यकीय सेवा देण्यात यावी, अशी आग्रही मागणी खासदार महाडिक यांनी केली. ही मागणी तत्काळ मान्य करण्यात आली. दरम्यान कोल्हापूर रेल्वे स्थानकावर फूट ओव्हर ब्रीज आणि अन्य विकासकामे मार्गी लावल्याबद्दल उपस्थित खासदार मंडळींनी धनंजय महाडिक यांचे विशेष अभिनंदन केले.

Leave a Reply