स्पर्धा परीक्षांर्थींसाठी लोकराज्य उपयुक्त:उपजिल्हाधिकारी

 

कोल्हापूर : स्पर्धा परीक्षांर्थींसाठी लोकराज्य उपयुक्त ठरत असून कृषी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी लोकराज्यचे वर्गणीदार व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालय आणि राजर्षि शाहू महाराज कृषि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या लोकराज्य वाचक मेळाव्याचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. समारंभास राजर्षि शाहू महाराज कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी.जी.खोत, जिल्हा माहिती अधिकारी एस.आर.माने, महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. बी.एस. पाटील, स्थानिक पालक प्रमुख डॉ. व्ही.जे. तरडे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. बी.टी. कोलगणे आदीजण उपस्थित होते.
राज्यातील सर्वाधिक खपाचे मराठी भाषेतील लोकराज्य हे एकमेव मासिक असल्याचे स्पष्ट करून निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे म्हणाले, स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांना लोकराज्य सहाय्यभूत असून शासनाच्या विविध योजना, उपक्रम लोकराज्यच्या माध्यमातून जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचविले जात आहे. लोकराज्य मासिकामध्ये शासनाचे निर्णय, मंत्रिमंडळाचे निर्णय तसेच नव-नव्या योजनांबरोबरच जाणकारांचे लेख, यशस्वीतांच्या यशोगाथा, तज्ज्ञांच्या मुलाखती आणि एमपीएससी आणि युपीएससी परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या गुणवंतांच्या मुलाखती, अनुभव यासह विविध उपयुक्त सदरांचा समावेश असल्याने लोकराज्य मासिक विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक आहे.
विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवून विविधांगी विशेषत: स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असणाऱ्या लोकराज्यसारख्या पुस्तकांच्या वाचनावर भर द्यावा असे आवाहन करून निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे म्हणाले, सातत्यपूर्ण वाचनाने तसेच सरावाने विद्यार्थ्यांमध्ये निश्चितपणे आत्मविश्वास निर्माण होतो, मात्र विद्यार्थ्यांनी कष्ट आणि चिकाटी ठेवावी, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी कृषि महाविद्यालयातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या विद्यार्थी दशेतील तसेच स्पर्धा परीक्षेतील अनुभव सांगितले.
राजर्षि शाहू महाराज कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी.जी.खोत यांनी लोकराजय मासिकाचे कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी असलेले महत्व आपल्या भाषणात विषद केले. सर्व विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार होण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रांरभी जिल्हा माहिती अधिकारी एस.आर.माने यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात म्हणाले, गेल्या 70 वर्षापासून शासनाच्या योजना आणि उपक्रम जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्याचे काम लोकराज्य मासिकाने केले आहे. विविध स्पर्धा परीक्षार्थींना उपयुक्त ठरणाऱ्या लोकराज्यामध्ये शासनाचे निर्णय, मंत्रिमंडळाचे निर्णय, विविध शासन योजना यासह विविध सदरे प्रसिध्द केली जातात. अलिकडील काळात विविध विषयाला वाहिलेले विशेषांकही प्रकाशित केले आहेत. राज्यभर आज लोकराज्य वाचक अभियान राबविले जात असून विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार व्हावे, असे आवाहन केले.
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आज आयोजित केलेल्या लोकराज्य वाचक मेळाव्यानिमित्त लोकराज्य विषयी माहिती देणाऱ्या आकर्षक कॅनोपी या लोकराज्य विक्री केंद्राचा शुभारंभही निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास, जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी तसेच कृषि महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक तसेच विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!