
कोल्हापूर: थोर स्वातंत्र्यसेनानी देशभक्त डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर रोजी कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च इन्स्टिट्यूट व गांधी तत्त्व प्रसार केंद्र यांच्यावतीने डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन व विविध क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या समाजरत्नांचा सत्कार करण्यात येणार आहे. या प्रसंगी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजन गवस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नाईट कॉलेजमधील मराठी विभाग प्रमुख डॉ. अरुण शिंदे लिखित देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे चरित्र महाराष्ट्र बसव परिषद यांनी प्रसिद्ध केले आहे.रत्नाप्पा कुंभार यांची जडणघडण, स्वातंत्र्य लढ्यातील कार्य, राजकीय नेतृत्व, सहकार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील सर्वांगीण कार्य चरित्र रुपाने प्रकाशित होत आहे. समाजाला नवी दिशा देणाऱ्या व तत्त्वनिष्ठेने कार्यरत असणार्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यानिमित्ताने विशेष सत्कार करण्यात येणार आहे. व्यसनमुक्ती व पर्यावरण संवर्धनसाठी जन स्वास्थ्य दक्षता समिती अध्यक्ष दीपक देवळापूरकर, चेतना अपंगमती संस्थेचे पवन खेबुडकर, हेल्पर्स ऑफ दी हॅण्डिकॅप्ड चे पी. डी. देशपांडे आणि ऋणानुबंध चॅरिटेबल ट्रस्टच्या स्वरूपा कोरगावकर या कृतीशील समाजसेवकांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या प्रसंगी कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष प्रसाद पाटील, संचालक ॲड. व्ही. एन. पाटील, मगदूम एंडोसर्जरी इन्स्टिट्यूटचे विश्वनाथ मगदूम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. डीआरके कॉमर्स कॉलेजच्या सभागृहामध्ये १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होत आहे. रत्नाप्पांणांच्या या विधायक कार्याचा वारसा पुढे वृद्धिंगत राहण्यासाठी व चांगले काम करणाऱ्या माणसांचा गौरव व्हावा आणि त्यांचे कार्य समाजासमोर यावे या उद्देशाने त्यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येते अशी माहिती डॉ विश्वनाथ मगदूम आणि कॉलेजचे प्राचार्य विलास पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी डॉ.अरुण शिंदे ॲड व्ही. व्ही एन. पाटील उपस्थित होते.
Leave a Reply