
कोल्हापूर: श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा शारदीय नवरात्र उत्सव शांततामय व मंगलमय वातावरणामध्ये पार पडण्याच्या दृष्टीने सर्व शासकीय विभागाची बैठक लवकरच घेण्यात येणार असून नवरात्र कालावधीमध्ये येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यावर कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा करून मार्गदर्शक सूचना करण्यात येणार आहेत. तसेच नवरात्रच्या पूर्वी संपूर्ण मंदिर व मंदिर आवारामध्ये उगवलेली झाडेझुडपे देवस्थान समितीच्यावतीने काढण्यात येत आहेत. गेली पंधरा वर्षे एसएमएस इंटिग्रेटेड फॅसिलिटी सर्विसेस च्या वतीने विनामूल्य मंदिराची स्वच्छता करण्यात येत आहे. या वर्षी या कामाला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण मंदिर परिसरात विद्युत रोषणाई व सीसीटीव्ही यांची तपासणी करून जे नादुरुस्त आहेत ते त्वरित दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येत आहे. नवरात्री पूर्वी श्री अंबाबाई चे दागिने गरुड मंडप मध्ये देवस्थान समितीचे अधिकारी व सुरक्षारक्षकांच्या बंदोबस्तात स्वच्छ करून घेण्यात येणार आहेत. संपूर्ण नवरात्री उत्सवामध्ये त्या त्या दिवशीचे उत्सव सुरळीत पार पाडण्यात येणार आहेत. देवीच्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पारंपारिक पद्धतीने मंत्र पठणाने सुरुवात करण्यात येईल. घटपूजन विधी व अभिषेक अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते करून नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. मंदिर परिसरात सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत संगीत कार्यक्रम आयोजित केले आहेत. भाविकांना देवीच्या साडीचा प्रसाद मिळावा या हेतूने घाटी दरवाजा येथे विक्री स्टॉल चालू करण्यात येणार आहे. भाविकांच्या सेवेसाठी 24 तास मेडिकल कॅम्प उपलब्ध असणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, सेवा संस्था यांच्या सहकार्याने व्यवस्थापन केले जाणार आहे. स्वाईन फ्ल्यूच्या प्रतिबंधासाठी दर्शन रांगेमध्ये मस्ट फॅन बसवण्यात येणार आहे. तसेच प्रतिबंधक औषधांचा वापर आणि रांगेत गारवा निर्माण करण्यासाठी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. श्रीपूजक यांचेकडून देवीची विविध रूपांमध्ये पूजा बांधण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला कोषाध्यक्ष वैशाली शिरसागर संगीता खाडे शिवाजी जाधव उपस्थित होते.
Leave a Reply