
कोल्हापूर: प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर व श्रीराम सेवा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या झिम्मा-फुगडी स्पर्धेस कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या महिला भगिनींचा उदंड प्रतिसाद मिळाला. याच कार्यक्रमात ‘आदर्श आई पुरस्कार’ देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला.
या स्पर्धेचा शुभारंभ महापौर शोभा बोंद्रे यांच्या शुभ हस्ते तसेच शांतादेवी डी. पाटील, वैजयंती पाटील, राजलक्ष्मी नरके, विद्याताई पोळ, आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. संयोजक सौ प्रतिमा सतेज पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना प्रतिमा पाटील म्हणाल्या, महाराष्ट्रातील महिलांचा आपलासा वाटणारा व एकमेकींना सांभाळत पुढे घेऊन जाणारा खेळ म्हणून झिम्मा फुगडीचा खेळ सर्वत्र खेळला जातो. या खेळामुळे आरोग्यही उत्तम राहते. महिलांना आपल्या कलागुणांचा आनंद लुटता यावा व नवीन पिढीला हा खेळ समजून यावा म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअरच्या माध्यमातून एक आदर्श व सक्षम स्त्री घडवण्याचा प्रयत्न नेहमीच राहिलेला आहे. चौदा वर्षांपूर्वी गृहिणी महोत्सवाच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. यातून महिलांमध्ये आपले कलागुण दाखवण्याचं धैर्य निर्माण झालं. बचत गटांच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम राबवले. त्यातून महिलांना स्वावलंबी बनवत रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. ज्यामुळे असंख्य महिला स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ्या राहू शकल्या आहेत.
महापौर शोभा बोंद्रे म्हणाल्या, महिलांचा दिनक्रम हा कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात, मुलांचे संगोपन करण्यात जात असतो. यामध्ये महिला आपलं अस्तित्वच हरवून बसतात. आजच्या या धावपळीच्या युगात स्वतःसाठीही वेळ देता यावा म्हणून प्रतिमा सतेज पाटील यांनी वेल्फेअरच्या माध्यमातून घेतलेलं हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे.
आमदार सतेज पाटील म्हणाले, प्रतिमा पाटील यांनी महिलांना संघटित करून ज्याप्रमाणे सक्षम केले त्याप्रमाणे प्रत्येक रणरागिनी ने तयार झालं पाहिजे. आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन पुढे जाण्याची भूमिका सर्व महिलांनी स्वीकारावी. डी. वाय. पाटील कुटुंबीय नेहमीच पुण्याईचं आणि विश्वासार्हतेचं काम करत आलं आहे. आपला एक बंधू व मुलगा म्हणून महिला शक्तीला माझी सातत्याने मदत राहील.
यावेळी श्रीमती छाया पिंगळे (कसबा बावडा), ताराबाई संकपाळ (खेबवडे), उमाताई जगनाडे (सांगवडे), राजश्री सूर्यवंशी (कोल्हापूर), प्रा. डॉ. अंजली साळवी यांचा आदर्श आई पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तर मेघा बांभोरीकर, स्मिता खामकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी स्पर्धेच्या ठिकाणी ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांच्या प्रतिकृती, ग्राम जीवन उभे केले होते. अनेक महिलांनी या ठिकाणी सेल्फीचा आनंद लुटला.
कार्यक्रमास माजी महापौर सई खराडे, श्रीराम संस्थेच्या उपसभापती जया उलपे, संचालिका वनिता बेडेकर, नंदिनी रणदिवे, नगरसेविका उमा बनसोडे, शिरोळ पंचायत समिती सभापती अर्चना चौगुले, ऋग्वेदा माने, वैभवी जरग, माजी महापौर स्वाती यवलुजे, माधुरी लाड, प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती अशोक जाधव, श्री राम सोसायटीचे सभापती प्रविण लाड यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य महादेव नरके यांनी केले.
Leave a Reply