
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोल्हापूर शाखेच्या वतीने संगीतसूर्य केशवराव भोसले पुण्यतिथी दिनानिमित्त गुरुवारी ४ ऑक्टोंबर रोजी दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच संध्याकाळी ७ वाजता बहुचर्चित असे ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. आणि केशवराव भोसले यांच्या जयंती किंवा पुण्यतिथीचे औचित्य साधून कोल्हापुरातीलच कलाकारांचा गौरवपूर्ण सत्कार केला जातो. या वर्षीचा हा मान कोल्हापूरचे सुप्रसिद्ध नाट्य चित्रपट व दूरदर्शनवरील लोकप्रिय कलाकार आनंद काळे यांना महापौर शोभा बोन्द्रे व मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. अशी माहिती कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष मनोहर कुईगडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत ‘ २० वर्षावरील खुल्या गटात सेमी क्लासिकल गीतगायन स्पर्धा होणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे संगीतसूर्य केशवराव भोसले यांची ९ ऑगस्ट रोजी जयंती साजरी केली जाते. यावर्षी ४ ऑक्टोंबर रोजी त्यांची पुण्यतिथी मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने साजरी केली जाणार आहे. यानिमित्त या भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. असे नाट्य परिषदेचे संचालक गिरीश महाजन यांनी सांगितले. संगीत देवबाभळी या नाटकाने यावर्षीचे सर्वाधिक ३७ पुरस्कार पटकावले असून अतिशय नावाजलेले नाटक आहे. कोल्हापूरच्या प्रेक्षकांसाठी हे नाटक विनामूल्य असणार आहे. याच्या सन्मानिका त्याच दिवशी नाट्यगृहावर सकाळी नऊ वाजल्यापासून उपलब्ध होणार आहेत. तसेच संगीत स्पर्धेसाठी देखील कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. स्पर्धेचा निकाल त्याच दिवशी संध्याकाळी आयोजित कार्यक्रमात जाहीर केला जाणार आहे. पत्रकार परिषदेला सीमा जोशी, हेमसुवर्णा मिरजकर, शशिकांत चौधरी, आनंद कुलकर्णी अशोक जाधव, राजश्री खटावकर उपस्थित होते.
Leave a Reply