
कोल्हापूर : राज्यातील शहरांबरोबरच चार पाच गावांसाठी एक अशा पध्दतीने सांडपाणी शुध्दीकरणाचे प्रकल्प राबविण्याचा शासनाचा मानस असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना केले.
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये शासन पुरस्कृत एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीच्यावतीने स्ट्रीट लाईट नॅशनल प्रोग्राम हाती घेतला असून या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हुपरी नगरपालिकेमध्ये स्ट्रीट लाईट नॅशनल प्रोग्रॉमअंतर्गत लावलेल्या एलएडी दिवे ऑनलाईन पध्दतीने अनावरण केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन देसाई, कंपनीचे दिपक कोकाटे तसेच नगरपालिकांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र शंभर टक्के हंगणदारीमुक्त झाला असून आता राज्यातील सांडपाणी शुध्दीकरणाबाबत शासनाने विशेष मोहीम हाती घेतली असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यातील शहरांमध्ये सांडपाणी शुध्दीकरणाचे प्रकल्प हाती घेण्यात येत असून आता ग्रमीण भागातही सांडपाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. यासाठी चारपाच-चारपाच गावांसाठी सांडपाणी शुध्दीकरणाचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. या प्रकल्पांसाठी महानगरपालिका आणि नगरपालिकांना सहाय्य केले जाईल, असेही ते म्हणाले.
विजेची बचत आणि पर्यावरण रक्षण या मुख्य हेतूने राज्यात स्ट्रीट लाईट नॅशनल प्रोग्राम हाती घेतला असून यामुळे निश्चितपणे विजेची बचत होईल असा विश्वास व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यातील 1500 शासकीय इमारतींमध्ये एलईडी ट्युबलाईट, बल्ब तसेच एसी बदलण्याचा प्रकल्प यशस्वी केला असून यामुळे वर्षाला सुमारे 100 कोटीची बचत होणार आहे. यापुढे राज्यातील सर्व नगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडील सर्व इमारतीमध्ये वीजबचत व पर्यावरण संवर्धनासाठी एलईडी ट्युबलाईट, बल्ब तसेच एसी यासाठी हा प्रकल्प राबविण्याचा मानस आहे. विजेच्या बाबतीत महाराष्ट्र सक्षम झाला असला तरीही वीज बचतीचे नवनवीन प्रयोग हाती घेण्यास प्राधान्य दिले आहे.
राज्यात ग्रीन बिल्डिंग ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला असून यापुढे शासकीय इमारतीत ग्रीन बिल्डींग डिजाईनव्दारे करणे बंधनकारक केले आहे यामुळे नैसर्गिक प्रकाश, हवा, पाणी तसेच कचऱ्याची निर्गती आणि सांडपाण्याची व्हीलेवाट या गोष्टींनाही प्राधान्य दिले आहे. निसर्गाचा ऱ्हास रोकताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे वीज,पाणी बचतीचे नवनवे प्रयोग हाती घेणार असल्याचेही ते म्हणाले. ई-कार या उपक्रमालाही शासनाने प्राधान्य दिले असून इलेक्ट्रीक कारचा विनीयोग करण्यावर भर दिला आहे. राज्य शासनाने अशा पाच कार घेतल्या असून यापुढील काळात शहरातील वाहतुकीसाठी शासकीय कार्यालयांना ई-कार उपयुक्त ठरतील, असा विश्वासही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
नगरपालिकांचा कारभार अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, नगरपालिकांनी नागरिकांना पायाभुत सुविधा प्राधान्य क्रमाने उपलब्ध करुन देण्याबरोबरच विकासाचे नवनवीन प्रयोग हाती घ्यावेत. स्ट्रीट लाईट नॅशनल प्रोग्राम यशस्वी करण्यातही नगरपालिकांनी योगदान देऊन विजेची बचत करण्याबरोबरच पर्यावरणाचे संवर्धन करण्यात सक्रीय व्हावे.
प्रारंभी कंपनीचे दिपक कोकाटे यांनी स्वागत केले व म्हणाले, शहरातील पथदिव्यांच्या अकार्यक्षमतेची समस्या सोडवण्यासाठी तसेच ऊर्जा आणि सबसिडीचा अपव्यय टाळण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 12 नगरपालिकांनी एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेडशी (ईईएसएल) सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या नगरपरिषदामध्ये पारंपारिक पथदिव्याऐवजी आता स्मार्ट एलईडी बल्ब बसवले जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी 28 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून एलईडी दिव्यांनी उजळल्यानंतर दरवर्षी 12 दशलक्ष युनिट विजेची बचत होणार आहे, त्यामुळे प्रत्येक वर्षी 11 कोटी रुपयांची बचत होणार आहे.
समारंभास नगरपालिकांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यासह अनेक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply