
कोल्हापूर : सौ. प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर आणि कोल्हापूरातील विविध स्वयंसेवी व सामाजिक संस्थांच्यावतीने गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी ‘क्लीन कोल्हापूर’ ही स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. श्री महालक्ष्मी मंदीर परिसरात शुक्रवार दि.१९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता या मोहिमेचा प्रारंभ होणार असल्याची माहिती सौ. प्रतिमा सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, स्वच्छतेच्या अभावामुळे सध्या सर्वत्र डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू या सारखे आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. त्यामुळे कित्येक लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे आपले शहर, गांव व आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे अत्यंत महत्वाचे आहे. कोल्हापूरातील विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून ‘क्लीन कोल्हापूर’ या मोहिमेचे आयोजन केले आहे. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचा नवरात्र उत्सव हा चांगले काम करण्यासाठी उर्जा देणारा उत्सव ठरतो. या उत्सवातून सकारात्मक उर्जा घेवून ही मोहिम सुरु केली आहे.
शुक्रवारी होणाया या मोहिमेच्यावेळी महापौर सौ. शोभा बोंद्रे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी उपस्थित राहणार आहेत. या मोहिमेमध्ये कोल्हापूर रोटरी मुव्हमेंट
२०१८-१९, इनरव्हील क्लब, ऑयस्टर जैन्स ग्रुप, क्रिडाई कोल्हापूर, मुक्ता, अवनि, एकटी, व्हाईट आर्मी, अमिताभ फॅन्स क्लब वल्र्डवाईड, गार्डन क्लब इंगेडियन्स क्लब, सिमंतीनी मराठा महिला मंडळ, दिलासा सामाजिक संस्था, रणरागिणी ग्रुप, बिझनेस वुमन क्लब, कोल्हापूर प्रेस क्लब, शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना ( एन एस एस ), विवेकानंद कॉलेजचे माजी विद्यार्थी आदी सामाजिक व स्वयंसेवी संस्था तसेच विद्यार्थी, महिला बचतगट सहभागी होणार आहेत. यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने विशेष सहकार्य केले आहे.तसेच दर्शनासाठी ड्रेस कोड चे आवाहन योग्य आहे असेही सौ. पाटील म्हणाल्या.
Leave a Reply