
कोल्हापूर : कोल्हापूर शहराला पडलेला डेंग्यू आणि स्वाईन फ्ल्यूचा विळखा सुटत नसल्याचे दिसते. या साथींच्या रोगात नागरिकांचे जीव जात असून, प्रशासन गप्प बसले आहे. शुक्रवारी डेंग्यूने उदयोन्मुख युवा फुटबॉल खेळाडूचा, तर स्वाईन फ्ल्यूने वृद्ध डॉक्टरांचा बळी घेतला. एकीकडे साथीच्या रोगांनी शहरात थैमान घातले असताना प्रशासन आपली जबाबदारी झटकून याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. वेळीच उपाययोजना न झाल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे जबाबदारीने काम करा, माणसांचा जीव जाण्याची वाट पाहू नका, अन्यथा अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा सज्जड इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा रूग्णालय प्रशासनास दिला.शहरात थैमान घातलेल्या डेंग्यू आणि स्वाईन फ्ल्यू रोगाची साथ आटोक्यात आणण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज सीपीआर रुग्णालय येथे अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक, सीपीआर रुग्णालय, महानगरपालिकेचे आरोग्य व स्वच्छता विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलातना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, शहरामध्ये या रोगांच्या साथीने अक्षरश थैमान घातले आहे. परिस्थिती आटोक्यात आणली नाही तर याचे गांभीर्य आणखी तीव्र होणार आहे. एकीकडे शहरातील नागरिकांचे हकनाक बळी जात असताना, प्रशासनास या गोष्टीचे गांभीर्य नाही. या साथीच्या रोगात जीव गमावलेल्या नागरिकांच्या घरी सांत्वन करण्यास गेल्यावर नागरिक लोकप्रतिनिधींकडे आरोपीच्या नजरेने बघतात. लोकांच्या भावना तीव्र आहेत, वेळीच या गोष्टीचे गांभीर्य घ्या, अन्यथा अधिकाऱ्यांना रस्तावर फिरणे मुश्कील होईल. महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे काय काम आहे. त्यांनी काय खबरदारी घेतली. बळी पडलेल्या नागरिकांच्या मृत्यूस जबाबदार कोण? प्रशासनाच्या गलथान बेजबाबदार कामामुळे नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. महानगरपालिकेचे वॉर्ड दवाखाने सुस्थितीत नाहीत. त्याचा सगळा भार सीपीआरवर पडत आहे. त्यात सीपीआरबद्दल प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमुळे नागरिकांना सीपीआर मध्ये उपचार घेणे भीतीचे वाटत आहे. त्यामुळे नागरिकांना खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागतात. तर खाजगी दवाखान्यात त्यांची लुट केली जाते. प्रशासन आपली जबाबदारी झटकत आहे. वेळीच प्रशासनाने कारभार सुधारावा, अशा सुचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या.
ते पुढे म्हणाले कि, मागील आठवड्यात आरोग्य मंत्री महोदयांनी घेतलेल्या बैठकीत काय आदेश देण्यात आले होते. या साथींच्या रोगांबाबत प्रशासनाने कोणती जनजागृती मोहीम राबविली. एखाद्याला व्यक्तीला या रोगाची लागण झाली तर त्याच्यावर प्राधान्याने सरकारी दवाखान्यात उपचार करा. सीपीआर रूग्णालयाबाबतचे गैरसमज दूर करा. सरकारी रुग्णालये एवढी सुसज्ज असूनही लोकांना खाजगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च करून उपचार का घ्यावे लागतात? महानगरपालिकेचे वॉर्ड दवाखान्यांना महापालिकेकडून निधी दिला जातो, त्या निधीचे काय केले जाते? शहरात अस्वच्छता आणि धुळीचे साम्राज्य पसरले आहे, याकडे कोणाचे लक्ष आहे? अशी विचारणा केली. यावर उपस्थित सर्व अधिकारी निरुत्तर होते.आमदार राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले कि, या बैठकीनंतर येरे माझ्या मागल्या प्रमाणे कारभार करू नका, सर्वांची पुन्हा बैठक घ्या, लोकांच्यात साथीचा रोग आटोक्यात आणण्यासाठी जनजागृती करा, पेपर जाहिराती, वृत्तवाहिन्यांवर माहिती, जागोजागी फलक लावून घ्यावयाच्या काळजीची सविस्तर माहिती नागरिकांपर्यंत पोहचवा. कोल्हापूर महानगरपालिकेचे वॉर्ड दवाखाने सुसज्ज करून त्याठीकानीही डेंग्यू आणि स्वाईन फ्ल्यू रोगावरील औषधे उपलब्ध करून द्या, अशा सुचना केल्या.
Leave a Reply