
कोल्हापूर:उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात अनेक बदल गतीने होत आहेत. या नव्या बदलांना सामोरे जाण्यास विद्यापीठांनी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या ५६व्या वर्धापन दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते, तर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, सध्या उच्चशिक्षण क्षेत्रासमोर अनेक आर्थिक तसेच प्रतिकूल आव्हाने उभी राहताहेत. या परिस्थितीत जागतिक स्पर्धेत आपला विद्यार्थी कसा टिकेल, याची चिंता करण्याची वेळ प्रादेशिक विद्यापीठांवर आलेली आहे. त्यामुळे केवळ पदवीधर घडविण्यापेक्षा निश्चित रोजगाराची हमी देणारे शिक्षण देण्याची जबाबदारी विद्यापीठांनी स्वीकारण्याची गरज आज निर्माण झाली आहे. यापुढील काळात समाज विद्यापीठांकडे येणार नाही; तर विद्यापीठांनीच आता समाजाकडे जाण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने त्यांनी स्वतःच्या कार्यप्रणालीत आणि धोरणांत बदल करण्याचीही गरज आहे. पारंपरिक शिक्षण पद्धती बदलून आता नवतंत्रज्ञान आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमांचा अंगिकार करण्याची आवश्यकता आहे.
विद्यापीठांचा शैक्षणिक आलेख उंचावण्यामध्ये संशोधनाचे महत्त्वाचे योगदान असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. पाटील पुढे म्हणाले, संशोधन ही विद्यापीठांची अविभाज्य ओळख आहे. यापुढील काळातही नाविन्यपूर्ण व समाजाभिमुख संशोधनाचे महत्त्व अबाधित राहणार आहे. त्या दृष्टीने प्रशासकीय संशोधनाच्या पलिकडे जाऊन विद्यापीठांनी संशोधनाला चालना देण्याची गरज आहे. कल्पकता आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर नवसंशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात. परिसरातील एकही विद्यार्थी ज्ञानापासून वंचित राहणार नाही, याची जबाबदारी विद्यापीठांनी स्वीकारण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी कुलगुरू डॉ. पाटील यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यातील साम्यस्थळांचा उल्लेखही केला. ही दोन्ही विद्यापीठे कृषीबहुल क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आपापल्या विभागात उच्चशिक्षण व संशोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय स्वरुपाची कामगिरी बजावली आहे. त्याचप्रमाणे आपल्या ग्रामीणतेचा शिक्का पुसत राष्ट्रीय स्तरावर उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात मोहोर उमटविली असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूरच्या पुरोगामी प्रतिमा निर्मितीमध्ये राजर्षी शाहू महाराजांचे अतुलनीय योगदान असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.
अध्यक्षीय भाषणात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठाने अलीकडच्या काळात घेतलेल्या भरारीची माहिती दिली. शिवाजी विद्यापीठात सेंटर फॉर व्हीएलएसआय डिझाईन आणि सेंटर फॉर नॅनो-फॅब्रिक्स ही दोन केंद्रे उभारण्यात येणार असल्याची घोषणा कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केली. ते म्हणाले, सेंटर फॉर नॅनो फॅब्रिक्समध्ये नॅनो तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आधुनिक कापड निर्मितीच्या अनुषंगाने संशोधन करण्यात येणार आहे. भविष्यातील कपडे हे याच तंत्रज्ञानाच्या आधाराने निर्माण होणारे असतील. काळाची पावले ओळखून विद्यापीठात हे केंद्र विकसित होते आहे. सेंटर फॉर व्हीएलएसआय डिझाईन हे केंद्र आपल्या राष्ट्रीय योगदानाचे प्रतीक ठरणार आहे. आजवर साऱ्या जगात केवळ गुगल या अमेरिकी कंपनीची जीपीएस प्रणाली वापरली जात होती. तथापि, भारताने स्वतः विकसित केलेली आय.आर.एन.एस.एस. ही उपग्रह मालिका अवकाशात यशस्वीरित्या प्रक्षेपित केली आहे आणि त्यांच्या सहाय्याने भारत स्वतःची अत्याधुनिक जीपीएस प्रणाली विकसित करतो आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश केंद्रामध्येही या उपग्रह मालिकेचा एक रिसिव्हर बसविण्यात आला आहे आणि तो अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहे. हा रिसिव्हर बसविण्यात आलेले शिवाजी विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ आहे. या नव्या सेंटरच्या माध्यमातून संरक्षण खात्याला या आयआरएनएसएससाठी आवश्यक असणारे काही अत्यंत गुंतागुंतीच्या आणि महत्त्वाच्या चिप्स बनविण्याचे काम करण्यात येणार आहे. अशा प्रकारे राष्ट्रीय प्रकल्पामध्ये योगदान देण्यासाठी शिवाजी विद्यापीठ आता सज्ज झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठ प्रांगणात प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तसेच विद्यापीठ परिसरातून विशेष रॅलीचेही आयोजन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. पी.एस. पाटील, डॉ.ए.एम. गुरव, डॉ. भारती पाटील, इनक्युबेशन व इनोव्हेशन सेंटरचे संचालक डॉ. आर.के. कामत, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांचे कुटुंबिय, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply