कोल्हापूर:अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने जिल्हा कमिटीच्या वतीने आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दसरा चौकात आंदोलन
करण्यात आले. आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्याप एफ आर पी ची रक्कम शेतकऱ्यांना दिलेली नाही. ही रक्कम 14 दिवसाच्या आत देणे बंधनकारक असतानाही शंभर दिवस उलटून गेले तरी शेतकऱ्यांचे पैसे मिळालेले नाहीत. उलट साखर कारखानदार साखरेला दर नसल्याने आम्ही एफ आर पी देऊ शकत नाही त्याऐवजी शेतकऱ्यांनी साखर घ्यावी असा अजब फतवा काढला आहे. शेतकऱ्यांचे उसाचे बिल व्याजासह तात्काळ मिळाले पाहिजे. देवस्थान इनाम धारक शेतकऱ्याच्या वारसा आणि पीक-पाणी नोंदी करून त्या जमिनीत तात्काळ कसणाऱ्या च्या नावे झाल्या पाहिजेत. अनेक देवस्थान शेतकऱ्यांना अवाजवी खंड आकारण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. किसान सभेच्या गेल्या वर्षीच्या आंदोलनावेळी सरकारने लेखी देऊन तीन महिन्यात धोरणात्मक निर्णय करून अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले. पण अजूनही निर्णय झालेला नाही. जिल्ह्यात अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन ही रखडले आहे. शेतकऱ्यांची सर्व प्रकारची कर्जे माफ करण्यासाठी जाचक अटी रद्द झाल्या पाहिजेत. केंद्र सरकारने सध्या सुरू केलेली वार्षिक सहा हजार रूपयेची किसान सन्मान योजनेतही अनेक अटी लावल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही.रत्नागिरी- नागपूर हायवे बाधित शेतकऱ्यांना सर्व नैसर्गिक संसाधने लक्षात घेऊन पाचपट नुकसान भरपाई देण्यात आली पाहिजे. या मागण्यांसाठी आज अखिल भारतीय किसान सभेने दसरा चौक चौक येथे जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनात डॉ. उदय नारकर, कॉम्रेड सुभाष निकम,आप्पासो परीट, विकास पाटील, संभाजी यादव, कृष्णा चरापले, अमोल नाईक यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply