कोल्हापूर:जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून भागीरथी महिला संस्थेच्यावतीने, आज भागीरथी होम मिनिस्टर स्पर्धा झाली. शिवाय महिलांसाठी वेशभुषा स्पर्धाही होणार असल्यानं, अनेक युवती महिला नटून थटून आल्या होत्या. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून महिलांना विरूंगळा मिळावा, यासाठी आयोजित केलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला.धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीने, आज भागीरथी होम मिनिस्टर स्पर्धा झाली. प्रारंभी सौ. अरूंधती महाडिक यांनी संस्थेविषयी आणि या उपक्रमाविषयी माहिती दिली. कौटुंबीक जबाबदारीच्या बरोबरीने अनेक महिला नोकरी-व्यवसायात मग्न असतात. रोजच्या कामाच्या रहाट गाडग्यातून थोडी मुक्ती मिळावी आणि विरंगुळा मिळावा, यासाठी होम मिनिस्टर स्पर्धा घेतल्याचं त्यांनी सांगितले. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे रहावे, पण त्याचवेळी स्वतःच्या आरोग्याची स्वतः काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी डॉ.अनुष्का वाईकर, वैशाली भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. होम मिनिस्टर कार्यक्रमातून भागीरथी संस्थेच्या महिलांनी तुफान मौजमजा करत बक्षिसं जिंकली. त्यासाठी सत्यजित कदम, सिध्दांत हॉस्पिटल, स्फुर्ती दूध आणि जिजाई मसाले यांनी प्रायोजक म्हणून काम पाहीले. भागीरथी महिला संस्थेची सभासद नोंदणी सुरू असून, जास्तीत जास्त महिलांनी सभासदत्व घ्यावं, असे आवाहन करण्यात आले. दरम्यान सायंकाळी माजी खासदार धनंजय महाडिक, सौ. अरूंधती महाडिक, सत्यजीत कदम, पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं. होम मिनिस्टर स्पर्धेत पुलाची शिरोलीतील प्रणिता फराकटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. माधवी दळवी यांनी द्वितीय, तर सरिता हारुगले यांनी तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना पैठणी देण्यात आली. तर महाराष्ट्रीयन वेशभुषा स्पर्धेत प्रतिक्षा शियेकर यांना विजेतेपद मिळाले. द्वितीय क्रमांक तेजस्विनी तरके यांनी पटकावला. अश्विनी वास्कर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. कल्याणी जाधव, निमा गडदे, आशा खराडे, गीता कातवे, निलम बनछोडे, शुभदा पाटील आणि श्वेता भोसले यांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले. परिक्षक म्हणून मनिषा रानमाळे यांनी काम पाहिलं. यावेळी स्मिता माने, उमा इंगळे, सिमा कदम, संगीता खाडे, ग्रिष्मा महाडिक, धनश्री तोडकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या.