
कोल्हापूर : नवमाध्यमांमुळे पत्रकारितेपुढील आव्हाने वाढली आहेत. त्याचप्रमाणे पारंपरिक माध्यमांचा आकृतीबंधही बदलावा लागणार आहे. सद्यस्थितीत नागरिकच समाजमाध्यमांतून ब्रेकिंग न्यूज देत आहेत. यामुळे पत्रकारितेचे स्वरुप गतीने बदलत आहे, असे प्रतिपादन डॉ.सुधीर गव्हाणे यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभाग, विभागीय व जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर तसेच वारणा महाविद्यालय, ऐतवडे खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर होते.
डॉ. गव्हाणे म्हणाले, डिजीटल युगामध्ये पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी नवी कौशल्ये आत्मसात करण्याची गरज आहे. काळाबरोबर माध्यमे वेगाने बदलत आहेत. मनोरंजन व माध्यम क्षेत्र विस्तारत असताना सकस पत्रकारिता मात्र हरवत असल्याचे चित्र आहे. अतिव्यापारीकरणामुळे बातमीच्या मुखवट्यांनी माध्यमांमध्ये जाहिराती येण्याने पत्रकारितेला धोका निर्माण झाला आहे. बातम्यांमध्ये अचूक समतोल साधणे गरजेचे आहे, असे निर्वाणीने सांगण्याची वेळ आली आहे. सध्या २० टक्के लोक इंटरनेट वापरतात. भारतात ५० कोटी मध्यमवर्ग असून तो ७० कोटीवर जाण्याची शक्यता आहे. त्याचा भारतामध्ये डिजीटल साक्षरता वाढण्यास निश्चित मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कोरियामधील ‘ओह माय न्यूज’ या वृत्तपत्राचे उदाहरण देऊन डॉ. गव्हाणे म्हणाले, या वृत्तपत्रातील २६ हजार वार्ताहर हे सिटीझन जर्नालिस्ट आहेत. डिजीटल माध्यमे ही कुठेही, कधीही अन् केव्हाही सर्वांसाठी उपलब्ध असल्याने डिजीटल साक्षरता वाढत आहे. पाहणी व विविध अहवालांचा आधार घेऊन डाटा जर्नालिझमच्या माध्यमातून सक्षम पत्रकारिता सद्यस्थिती अपेक्षित आहे.
यावेळी डॉ. गव्हाणे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अधिविभाग प्रमुख डॉ. निशा पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रताप पाटील, माहिती अधिकारी एस.आर. माने, माजी विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित यांनी मार्गदर्शन केले. प्रसाद ठाकूर यांनी आभार मानले. जयश्री देसाई, शीतल माने यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुमेधा साळुंखे, डॉ. श्रीहरी देशपांडे, विनायक मिराशी, शिक्षणशास्त्र विभागाच्या निवृत्त प्रा. सुलोचना श्रीधर तसेच महावीर महाविद्यालय व वारणा महाविद्यालयाच्या पत्रकारिता विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
Leave a Reply