कोल्हापूर: अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या मध्यमा पूर्णच्या कथक नृत्य परीक्षेमध्ये ग्रामीण भागात कला क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रज्ञान कला अकादमीच्या कु. नक्षत्रा आवटी, शालवी रोकडे, समृद्धी आवटी व सेजल रोकडे या विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. तसेच कोल्हापूर केंद्रामध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये स्थान पटकावले. याचे औचित्य साधत गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला “नृत्य संध्या” हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक उमेश बोळके व कथक गुरू सौ.शुभांगी तावरे, अध्यक्ष रमेश हराळे, कोडोली गावचे सरपंच नितीन कापरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली.
प्रथम कथकमधील विशेष सादरीकरण करून विद्यार्थिनींनी रसिकांची मने जिंकली.या सादरीकरणाच्या वेळी साथ-संगत संदीप तावरे व सौ.नेहा आवटी यांनी केली. तसेच गुरु- शिष्याच्या नात्यातील भावविश्वाचे महत्व आदिती चौगुले हीने स्पष्ट केले. उमेश बोळके दिग्दर्शित मोक्ष, काजवा, पिंजरा, दगड, व संगर हे भावनाप्रधान चित्रपट दाखविण्यात आले. त्याप्रसंगी चित्रपट समीक्षक संदीप आडनाईक यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला.
दिग्दर्शक व प्रेक्षक यांच्यात समन्वय साधत, लघुपट हा समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम बनत आहे, असे मत व्यक्त केले.
करिअरच्या दृष्टीकोनातून कलाक्षेत्राकड़े ग्रामीण तरुणांनी पहावे, असे मत सचिव निलेश आवटी यांनी व्यक्त केले.कार्यक्रमास निवास लोखंडे, शैलेश शिंदे, निलेश जाधव, दिपक खटावकर तसेच प्रज्ञान कला अकादमीचे संचालक रमेश चौगुले कालिदास बोरकर मंगेश कांबळे, तानाजी शिंदे ,शिरीष शेवड़े आदी उपस्थित होते.

Leave a Reply